चिट्टी लिहून संपविले जीवन
अमळनेर : तालुक्यातील रणाईचे येथे 22 वर्षीय तरुणाने चिट्टी लिहून आपले जीवन संपविले असल्याची दुर्दैवी घटना घडली. शनिवारी आपल्या राहत्या घरात या तरुणाने गळफास घेतला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथील 22 वर्षीय तरुण भूषण सीताराम शेंडगे या तरुणाने आपल्या राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ज्या आईच्या साडीच्या पदरातील छायेत मुलगा वाढला त्याच आईच्या साडीने मुलाने गळफास घेतल्याने आईचे मन हेलावून गेले, या तरुणाने आपल्या आई व वडिलांना चिट्टी देखील लिहिली आहे. यात तो म्हणतो, “आई बाबा…. मला माफ करा, हे मी स्वतःच्या इच्छेने करीत आहे, यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये.” अशी चिट्टी त्याने लिहिली आहे.
दरम्यान या बाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.