डॉ.कलाम पुस्तक भिशीतर्फे
बेलसरे यांचा हृद्य सत्कार
अमळनेर: महाराष्ट्र शासनाचा बालकवी वाङ्मय पुरस्कार प्राप्त तसेच मराठी बालभारती आणि विविध माध्यमांच्या शाळांसाठी अभ्यासक्रमात एकूण सात कविता समाविष्ट असलेल्या सुप्रसिद्ध बालसाहित्यिका मायाताई धुप्पड यांनी पुस्तक प्रेमी दिनानिमित्त सुधर्मा संस्थेच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची वाचनाभिरूची वाढून मनं सुसंस्कृत व्हावे.ध्येयनिष्ठा व सामाजिक उत्तरदायित्व या मूल्यांचे रुजवणूक व्हावी या उद्दिष्टाने स्वलिखित राज्य पुरस्कार प्राप्त बालकविता संग्रह ‘ सावल्यांच गाव ‘ यांसह दर्जेदार काव्यसंग्रह व कथासंग्रहाच्या एकूण २४ पुस्तकांचे ग्रंथदान दिले.सदरहू ग्रंथदान माया धुप्पड यांच्यावतीने साने गुरुजी कथामाला माजी सहसचिव विजय लुल्हे यांच्या हस्ते सुधर्मा ज्ञानसभा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हेमंत बेलसरे यांना सुपूर्द करण्यात आले.
आजगायत माया धुप्पड यांनी लाखो रुपयांची हजारो पुस्तके मोफत अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तसेच विविध वाचनालय आणि सामाजिक संस्थांना भेट दिली आहेत. ग्रंथदात्री धुप्पड मॅडम यांनी नुकत्याच फेबुवारी २०२४ मध्ये अमळनेरला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात एकूण ३० ००० रुपयांची ३०० पुस्तके स्पर्धक विद्यार्थ्यांना ग्रंथभेट दिली.
सुधर्मा ज्ञानसभा संस्था दोन दशकांपासून कचरावेचक विद्यार्थी व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य,गणवेश आणि परीक्षा फी साठी आर्थिक मदत अनेक सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांकडून निरंतर उपलब्ध करून देत असते.परिणामी त्या बालकांचे हरवलेले बालपण व अनाथ झाल्यामुळे होणारे शैक्षणिक नुकसान कायमचे थांबते.त्यांच्यात शैक्षणिक ऊर्मी जागृत होऊन नवचैतन्याने ते शिकतात.या सुधर्माच्या प्रेरक योगदानाचे समर्पित व्रतस्थ समाजसेवक तथा सुधर्मा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हेमंत बेलसरे यांचा भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,जळगाव तर्फे शाल,श्रीफळ देऊन पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी भावपूर्ण सत्कार केला.
पूज्य साने गुरुजींची १२५ वी जयंती तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दीच्या औचित्याने आणि वयाची साठी पुर्ण झाल्याच्या आनंद पर्वावर डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम,साने गुरुजी तसेच शहीद पद्मश्री नरेंद्र दाभोळकर,गोविंद पानसरे लिखित पुस्तके तसेच शैक्षाणिक,सामाजिक,पर्यावरण,धार्मिक आणि पुरोगामी अशा दर्जेदार ३५ पुस्तकांचे सादर ग्रंथदान सुधर्मा संस्थेसाठी हेमंत बेलसरे यांना सन्मानपूर्वक सुपूर्द केले.याप्रसंगी सुधर्मा संस्थेच्या अध्वर्यू आदर्श शिक्षिका सौ.सुनिता बेलसरे उपस्थित होत्या.