मंत्री अनिल पाटील यांची शहरवासीयांना अनमोल भेट
पाडळसरे धरणावरून 197 कोटींची योजना,सौरउर्जेमुळे वीजबिलही वाचणार
अमळनेर : येथील नगरपरिषदेवर मंत्री अनिल पाटील यांची सत्ता असताना त्यांनी अमळनेरकराना संपूर्ण सात दिवस 24 तास म्हणजे दररोज पाणीपुरवठा करण्याचा दिलेला शब्द खरा करून दाखविला असून त्यांच्याच प्रयत्नाने या
भूमीसाठी जलसंजीवनी ठरणाऱ्या 24 बाय 7 या नगरपरिषदेच्या नवीन पाणीपूरवठा प्रकल्पास नगरोथान योजनेंतर्गत राज्यशासनाची मंजुरी मिळाली आहे.याबाबतचा शासन निर्णय दि.13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला.
सदर योजना पाडळसरे धरणावरून असून सुमारे 197 कोटी 22 लक्ष 52 हजार निधीतून ही योजना पूर्णत्वास येणार आहे.धरणावरून उचललेले पाणी कळमसरे,खेडी,वासरे,चौबारी,जैतपिर,गलवाडे बु व खुर्द आणि तेथून ढेकू रोडवरील बांधकाम विभागाजवळील नवनाथ टेकडीवरील नव्याने होणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन तेथून शहरातील जलकुंभामध्ये वितरित होणार आहे.विशेष म्हणजे सदर योजनेत पाणी उचल केंद्र असलेल्या धरणावर आणि जलशुद्धीकरण केंद्र असलेल्या नवनाथ टेकडीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने पालिकेचे मोठ्या प्रमाणात वीजबिलही वाचून अमळनेरकरांची वर्षभर तहान भागविण्यासाठी पाणीच पाणी उपलब्ध असणार आहे.यात विशेष बाब म्हणजे धरणावरून पाणी उचलण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून 9.14 द.ल.घ.मी.एवढे पाणी आरक्षित करण्यासाठी मंजुरीही घेण्यात आली असून शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढता विस्तार लक्षात घेता ही मंजुरी घेतली गेली असून 2056 पर्यंत हे आरक्षण असणार आहे.
मंत्री पाटील यांचे आधीपासूनचे होते स्वप्न,,, काही वर्षांपूर्वी मंत्री अनिल पाटील यांच्या पत्नी सौ जयश्री पाटील या लोकनियुक्त नगराध्यक्षा असताना त्याचवेळी अंबरीश महाराज टेकडीवर नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे निर्माण झाले होते प्रत्यक्षात त्याचवेळी त्यांनी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न
पाहिले होते,परंतु
पालिकेतील घडामोडी मुळे ते स्वप्न अपूर्ण राहिले
होते.आताआमदार व मंत्री झाल्यानंतर ते स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी व वाढत्या लोकसंख्येमुळे गरज लक्षात घेऊन नगरविकास विभागाच्या नगरोथान योजने तर्गत नवीन पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचे पालिकेला सूचित केले.
मुख्याधिकारी तुषार नेरकर ,पाणी पुरवठा अभियंता प्रविणकुमार बैसाणे तसेच जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन सर्वेक्षण केले आणि पाडळसरे धरणातून यंत्रणा फायनल केली.सदर योजनेला 27 जून 2024 ला तांत्रिक मान्यता मिळाली.आणि धरणावरून पाणी आरक्षण साठी 10 जुलै 2024 रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून पाणी आरक्षण मंजुरी मिळाली.
अशी असेल ही योजना,,, पाडळसरे धरणाच्या मुख्य भिंतीपासून काही मीटर अंतरावर तापी नदी पात्रात अगदी मधोमध इंटेक वेल(अशुद्ध पाणी उचल केंद्र) आणि इंस्पेक्शन वेल असतील.आणि नदी काठाजवळ जॅक वेल असेल. त्याठिकाणी 442 अश्वशक्तीचे तीन पंप असतील.यात दोन कार्यन्वित व एक जादा असेल.उचललेले पाणी जॅकवेल मधून पाडळसरे ,कळमसरे, वासरे
, चौबारी
,जैतपिर,गलवाडे मार्गे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवनाथ टेकडीपर्यंत येईल. या 20.6 किमी अंतरासाठी 700 मिमी व्यासाची डीआय के 9 रायझिंग पाईपलाईन टाकली जाणार असून टेकडीवर 28 एम एल टी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र तसेच 6 मीटर उंचीची 18.60 लक्ष लिटर क्षमतेची दुसरी टाकी(साठवण साठी एम बी आर) असेल. त्याठिकाणी 90 एच पी चे तीन पंप असतील. 24 तास टाक्या फुल असतील. ऑटोमॅटिक यंत्रणा असल्याने टाक्यांमधील पाणी पातळी कमी झाल्यास पंप आपोआप सुरू होतील. तेथून 500 ते 600 मिमी व्यासाच्या पाईप लाईन ने पाणी कोर्टाजवळ नव्याने बांधण्यात येणाऱ्या 20 मीटर उंचीच्या 25.80 लक्ष लिटर क्षमता असलेल्या टाकीत टाकले जाईल. तेथून शहरात पाणी वितरणसाठी 211.52 किमी नवीन जलवितरण पाईप लाईन टाकून पाणी पुरवठा केला जाणार आहे.
अशी होती जळोद डोहाची योजना,,, याआधी अमळनेर शहरासाठी 1971 साली तापी नदीवरील जळोद डोहातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली,याचे जलशुद्धीकरण केंद्र गांधली येथे होते,प्रत्यक्षात तापी नदीचा डोह खाली व जॅकवेल उंचावर यामुळे एकप्रकारे एक तांत्रिक दोष या योजनेत आहे तसेच उन्हाळ्याच्या शेवटी हा डोह आटत असल्याने गंगापुरी धरणातून किंवा हतनूर धरणातून आवर्तन विकत घ्यावे लागते यासाठी मोठी आर्थिक झळ पालिकेस बसत असते,2014 साली जयश्री पाटील नगराध्यक्षा असताना त्यांनी शहराची गरज लक्षात घेऊन अंबरीश
महाराज टेकडीवर नवीन जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित केले होते.त्यावेळी रेल्वे रूळ ओलांडून पाईपलाईन टाकण्यासाठी आताचे मंत्री अनिल पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी मिळवली होती.त्यामुळे सदर योजनेने आतापर्यंत अमळनेरकरांची सुरळीत तहान भागवली आहे.मात्र या योजनेत पालिकेला दरमहा सुमारे 30 लक्ष रुपये वीज बिलाचा भार सोसावा लागत आहे.
माझे स्वप्न साकार होत असल्याचा आनंद शेतकरी बांधवांसाठी पाडळसरे धरण नवसंजीवनी असल्याने याच्या पूर्णत्वासाठी मी जीवाचे रान करून प्रयत्न करीत आहे,याच धरणावरून अमळनेर शहराची तहान भागविण्यासाठी 24 तास पाणीपुरवठा करण्याचे स्वप्न मी पाहिले होते जनतेच्या आशिर्वादाने मंजुरी घेण्यास यश आल्याने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच सहकार्य करणारे जिल्ह्याचे दोन्ही मंत्री यांचा मी आभारी आहे.नवीन योजना पूर्णत्वास आल्यावर उद्योग व धंद्यांना देखील चालना मिळणार असून खऱ्या
अर्थाने हे धरण शहर व ग्रामीण दोघांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.सदर योजना मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, ना अजित पवार,ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जाहीर आभार.
अनिल भाईदास पाटील
मंत्री-मदत व पुनर्वसन(आपत्ती व्यवस्थापन, म.रा.)
पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार 24 बाय 7 ही नवीन पाणीपुरवठा योजना अमळनेर शहरासाठी खरोखरच उपयुक्त असून पाडलसरे धरणात बाराही महिने पाणी राहत
असल्याने सदर अमळनेर शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.विशेष म्हणजे सोलर प्रोजेक्त मुळे वीज बिल वाचणार असल्याने पालिकेचा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे.
तुषार नेरकर
मुख्याधिकारी तथा प्रशासक
नगरपरिषद, अमळनेर