राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दोन दूत अमळनेरात दाखल
अराजकीय व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी
अमळनेर : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे अमळनेर मतदार संघावर चांगलेच लक्ष दिले जात असल्याचे दिसून येते. मंत्री अनिल पाटील पुढील विधानसभेत दिसणार नाहीत ह्या त्यांच्या वक्तव्यानंतर मोठ्या घडामोडी अमळनेर मध्ये घडतांना दिसून येत आहे. आचार संहिता लागण्यापूर्वी अमळनेर येथे शरद पवारांचे दोन दूत आले होते तर त्यांनी अराजकीय व सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भेटी शहरातील नर्मदा रिसॉर्ट येथे घेऊन स्थानिक समस्या जाणून घेतल्या.तसेच सदर समस्या शरद पवार यांना सांगितल्या जातील व महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या प्रश्नांवर निर्णायक तोडगा काढला जाणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
सकाळीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विश्वास लवंडे व माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी अमळनेर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्या घरी पत्रकारांशी संवाद साधला.या दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या उमेदवारीच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की येत्या 15 तारखेच्या आत एकनिष्ठ कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल. सदर अमळनेर विधानसभा मतदारसंघावर शरद पवार यांचे विशेष लक्ष असल्याने पक्षाची त्या पद्धतीने आखणी सुरू आहे. विजयी होणाऱ्या उमेदवारालाच पक्षाचे तिकीट दिले जाण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.