
केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेशाचा मार्ग मोकळा,मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघांच्या संयुक्त प्रयत्नांना यश
अमळनेर-निम्न तापी पाडळसरे धरण केंद्राच्या योजनेत समाविष्ट होण्यासाठी सर्व मार्ग मोकळे होताना दिसत असून नुकतीच या धरणाला केंद्र शासनाच्या पर्यावरण,वन आणि जल परिवर्तन मंत्रालयाने फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता दिल्याने या धरणाचा केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेशाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.
मंत्री अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांच्या संयुक्त प्रयत्नांने ही मान्यता मिळाली आहे.सदर मान्यतेसाठी प्रस्ताव सादर झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने 3 मे 2024 रोजी तत्त्वता मान्यता देऊन अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन विभागाकडे सादर करण्यात आला होता.सुरवातीला मंत्री अनिल पाटील हे या मान्यतेसाठी सतत पाठपुरावा करीत असताना स्मिता वाघ खासदार झाल्यानंतर त्यांचीही मदत मिळाली.अखेर 29 जुलै 2024 रोजी केंद्रीय वन मंत्रालयाने महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाला फॉरेस्ट क्लिअरन्सची अंतिम मान्यता दिल्याचे पत्र दिले आहे.या मान्यतेमुळे पुढील मार्ग अत्यंत सुकर झाला असून लवकरच या प्रकल्पाचा केंद्रीय योजनेत समावेश होईल त्यासाठी आमचे जोरदार प्रयत्न असून खान्देशचे सुपुत्र असलेले केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांनी सकारात्मकता दाखवली असल्याची माहिती मंत्री अनिल पाटील व खा.स्मिता वाघ यांनी दिली.
दरम्यान गेल्या साडेचार वर्षात मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाने समाधानकारक निधी दिल्याने धरणाचे काम प्रगतीपथावर आहे.त्यात राज्य शासनाने 4800 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन केंद्राच्या योजनेत समावेश होण्यासाठीचा मार्ग मोकळा केला आहे.त्यानंतर प्रकल्पाची फाईल केंद्र शासनाकडे गेल्यानंतर तेथेही प्रत्येक टप्प्यावर यश येऊन आधी केंद्रीय जल आयोगाची मान्यता त्यानंतर फायनान्स क्लिअरन्स व आता फॉरेस्ट
क्लिअरन्स ची अंतिम मान्यता देखील मिळाल्याने केंद्राच्या योजनेत समावेश होण्याचा दिवस आता दूर नाही असा विश्वास अनिल पाटील यांनी व्यक्त करत सदर मान्यतेबद्दल केंद्रिय वन मंत्री भुपेंद्र यादव,केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना अजित पवार,वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.