“युवतीनीं स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योजक व्हावे”

मारवड ( ता. अमळनेर) दि.16 रोजी युवतींनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योजक होऊन स्वावलंबी बनावे व रोजगार शोधण्यापेक्षा स्वतःच्या गृह उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिते व्हावे यासाठी शासनाच्या विविध आर्थिक लाभाच्या योजना आपल्यासाठी तयार असल्याचे मत मारवडचे मंडळ अधिकारी अविनाश खैरनार यांनी शिबिरार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना काढले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व ( कै) न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय ,मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मनिर्भर युवती अभियानाचे आयोजन करण्यात आले असून आज युवतींच्या स्वयंरोजगार विषयक जनजागृती विषयांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय मारवड येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . ते पुढे म्हणाले की, विविध गृह उद्योगांसाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून आपणास आपल्या शेतमालावर प्रक्रिया केल्यानंतर स्थानिक बाजारपेठेत चांगला नफा मिळवता येऊ शकतो जसे, विविध यशस्वी गृह उद्योगांचे उदाहरण देऊन त्यांनी फळे, भाजीपाला, कडधान्य, दुग्ध व्यवसायांसह पापड ,शेवया, बटाटा चिप्स या उद्योगांना सदैव बाजारपेठ उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.


कृषी पर्यवेक्षक महेंद्र पवार यांनी शिबिरार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, शासनाद्वारे गृह उद्योगांना व शेतीपूरक व्यवसायांना विविध अर्थ सहाय्यक योजनांमधून पतपुरवठा करण्यात येतो. परंतु या योजनांची पुरेशी माहिती आपणास होत नसल्याने महिला वर्ग त्यापासून वंचित राहत असतो. शासन अर्थ सहाय्य करत असलेल्या योजनांमध्ये महिला उद्योगांना आर्थिक अनुदानही चांगले मिळत असल्याने अनेक छोट्या उद्योगांनी आज शहराच्या मुख्य बाजारपेठा काबीज केल्या आहेत. अनेक यशस्वी महिलांची उदाहरणे देऊन त्यांनी शासनाच्या विविध व्यवसाय पूरक योजनांची सविस्तर माहिती शिबिरार्थी विद्यार्थिनींना दिली.
महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय पाटील यांनी मार्गदर्शक व्याख्यात्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी महाजन हिने केले व आभार रूपाली साळुंखे यांनी मानले. यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, प्रा. किशोर पाटील ,सचिन पाटील, प्रताप भिल ,,जावेद खाटिक यांनी सहकार्य केले.